मित्रांनो, राज्यात घरकुलाच्या लाभासाठी पात्र असलेल्या परंतु घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध नसलेल्या लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी शासनामार्फत एक लाख रुपयांचे अनुदान दिले जाते. यासाठी राज्यामध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी अनुदान योजना राबवली जाते. या योजनेमध्ये काही महत्त्वाच्या सुधारणा करण्यात आल्या आहेत आणि त्यासंदर्भातील जीआर १४ ऑगस्ट २०२५ रोजी निर्गमित करण्यात आला आहे
या योजनेनुसार, भूमिहीन लाभार्थ्यांना ५०० चौ.फुटांपर्यंत जागा खरेदीसाठी एक लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे. जागेची किंमत ठरवताना खरेदी-विक्रीचा व्यवहार, गावठाणातील जमीनदर, मुख्य रस्त्यावरील जागेचे दर, तसेच विक्रेता आणि लाभार्थी यांच्यातील सौदा चिट्ठी या सर्व बाबींचा तालुकास्तरीय समितीमार्फत अभ्यास केला जाणार आहे. जागेची किंमत किंवा एक लाख रुपये – यांपैकी जे कमी असेल तेवढेच अनुदान दिले जाणार आहे.
लाभार्थी आणि जागामालक यांच्यातील विक्री करारानंतर प्रत्यक्ष खरेदी प्रक्रियाही तालुकास्तरीय समितीद्वारे केली जाईल. जर जागेची किंमत एक लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, तर एकापेक्षा जास्त लाभार्थी एकत्र येऊन जी +२, जी +३, जी +४ पर्यंत बहुमजली इमारती उभारू शकतात. मात्र, प्रति लाभार्थी जास्तीत जास्त एक लाख रुपयांपर्यंतच अनुदान मिळेल.
तसेच, किमान २० लाभार्थी एकत्र येऊन हाउसिंग कॉलनी उभारतील, तर रस्ता, पिण्याचे पाणी, वीज आदी मूलभूत सोयींसाठी अतिरिक्त २०% क्षेत्रासाठी अनुदान मिळेल. हे अतिरिक्त क्षेत्र सामायिक राहील आणि त्याची अंतिम मालकी ग्रामपंचायतीकडे राहील.
या सुधारणांमुळे भूमिहीन लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी मोठी मदत मिळणार आहे. इच्छुक लाभार्थ्यांनी आपापल्या जिल्ह्यात उपलब्ध अर्ज नमुन्यानुसार अर्ज करून हे एक लाख रुपयांचे अनुदान मिळवू शकतात.





